नांदेड- हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे वाळू चोरीत अडसर ठरणाऱ्या शेतकऱ्याचा सोमवारी (दि. 17 फेब्रुवारी) खून झाला होता. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना मनाठा पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी रामदास यास सोमवार (दि. 24 फेब्रुवारी) तर त्र्यंबक यास मंगळवार (दि. 25 फेब्रुवारी) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेतकऱ्याच्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपीना अटक हदगाव तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. रेती घाटा लगतच्या शेतकऱ्यांची या रेतीचोरांकडून खूप मोठी कमाई होत आहे. चोरीची रेती वाहतूक करणार्या वाहनांची अडवणूक करून अवाच्या सव्वा भू-भाडे वसूल करण्याचे प्रकार या शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु काही शेतकरी अशा फंदात नको म्हणून दुर्लक्ष करत आहेत. अशाच शिवाजी कदम या शेतकऱ्याच्या शेतातील पाणी रेती वाहतुकीच्या रस्त्यात येत असल्यामुळे वसूली करणाऱ्याने प्रामाणिक शेतकऱ्यास पिकास पाणी देण्यास मज्जाव केला होता.
परंतु त्याचे न ऐकता मोटार पंप सुरू करणाऱ्या शिवाजी कदम याची त्र्यंबक व रामदास चव्हाण या दोन भावांनी कत्तीचा वार करून हत्या केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधात मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी दोन पथक स्थापन करून खबऱ्यांमार्फत माहिती मिळवली. यातील रामदास चव्हाण यास बुधवारी (दि. 20 फेब्रुवारी) रात्री माहूर येथून अटक केली. काल (दि. 21 फेब्रुवारी) त्याला भोकर न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरा व मुख्य आरोपी त्र्यंबक चव्हाण यास आळंदी (जि. पुणे) येथील एका हॉटेलमधून अटक केली. त्याला आज भोकर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
हेही वाचा -टिप्परच्या धडकेत तरुणाचा मृत्यू... संतप्त नागरिकांनी केले 'रास्ता रोको' आंदोलन