नांदेड - जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 57 हजार 610 एवढी झाली असून, गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका यासह सर्व वैद्यकीय कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करून काम करत आहेत. अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यानच्या अकरा दिवसांत 12 हजार 656 रुग्णांवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, आजघडीला 12 हजार 382 रुग्ण उपचार घेत असून 230 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
हेही वाचा -'स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल.. शनिवार व रविवारचे पेपर पुढे ढकलले
रुग्णवाढीचा वेग देशाच्या टॉपटेनमध्ये
आपण मात्र कोरोना प्रतिबंधात्मक कुठलीही उपाययोजना वापरत नाही. त्यामुळे, रुग्णवाढीस आपणसुद्धा जबाबदार असतो. रुग्ण वाढल्यानंतर मात्र प्रशासन आणि वैद्यकीय सेवेवर टीका करून मोकळे होतो. जिल्ह्याला मोठ्या वेगाने कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून रुग्ण वेगाने वाढण्यात देशाच्या दहा टॉपटेन जिल्ह्यांमध्ये नांदेडचा समावेश झाला होता. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा आवाका मोठा वाढला असून रुग्णांची सेवा करत असताना त्यांना मात्र आराम नाही.
मृतांचा आकडा दिसतो पण बरे झालेल्या रुग्णांचा आकडाही दिसावा
जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढल्याचे सर्वांच्याच नजरेस येत आहे. पण, दररोज कोरोना रुग्णांचा आकडाही जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. सातत्याने डॉक्टरांची सेवा सुरूच असून 1 एप्रिल ते 11 एप्रिल इतक्या कालावधीतच 12 हजार 656 रुग्णांवर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 43 हजार 897 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.19 टक्के इतके आहे.
एक देवदूत म्हणून डॉक्टरांचे काम
गत वर्षभरात सहा महिन्यांच्या बालकापासून ते 103 वर्षांच्या आजीबाईला कोरोनातून मुक्त करून डॉक्टरांचे काम जिल्ह्यातील प्रत्येकाने पाहिले आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. अशा स्थितीत गावस्तरावरील कामापासून ते शहरापर्यंत नियोजन करण्यासाठी मेडिकल स्टाफ काम करत आहे. कोविड तपासणी, कोविड सेंटर, लसीकरण मोहीम, औषधांची उपलब्धता करणे आदींसह कामे करून दैनंदिन ओपीडीही कमी-जास्त प्रमाणात सांभाळावे लागत आहे. काही रुग्ण असे असतात की त्यांना टाळणेही अवघड असते. जसे की डिलिव्हरीचे रुग्ण टाळता येत नाहीत.