नांदेड -सध्या देशात आणि राज्यात राजकारणाचा नंगानाच सुरू असताना देशातील जनता मात्र हे सगळ आंधळी होऊन पाहत आहे. पण अशा काळातही केवळ मतदान करून भागणार नाही, तर नागरिकांनी याकडे उघड्या डोळ्याने पहावे. अजूनही सामान्य नागरिकांतून प्रतिक्रिया उमटत नाहीत. त्यामुळे मला तरी सध्याच्या राजकारणाला जनताच जबाबदार वाटते, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नांदेड येथे व्यक्त केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या १५० व्या जयंती निमित्त आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त तुषार गांधी नांदेड येथे व्याख्यानात बोलत होते. यावेळी गांधी पुढे बोलताना म्हणाले की, केवळ खादी घातली म्हणजे गांधी विचाराचे आपण होणार नाही. बापूंची ओळख आपल्या पोशाखाने नाही तर विचाराने होईल, यासाठी आपण काम केले पाहिजे. गांधीजीचे विचार आजही आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत का? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नैतिकतेसाठी आपल्याला न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. हे या देशातील नागरिकांसाठी योग्य नाही. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राजकारणासह समाजातही नेत्यांचे विभाजन केले जात आहे. जाती-धर्मात विभाजन केले असताना महात्मा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत का? हेही तपासून पाहिले पाहिजे. कुठलाही नागरिक सध्या राज्यातील आणि देशातील अशा पद्धतीच्या राजकारणाचा तमाशा बंद करा म्हणून पुढे आले नाही. हे किती दुर्दैव आहे.
हेही वाचा -संविधान दिनानिमित्त दोन्ही सभागृह एकत्र येणार; कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार
राजकारण आता खूप खालच्या पातळीवर गेले आहे, अशी टीका गांधी यांनी यावेळी केली. 'क्या हम गुलामही अच्छे थे क्या?' अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. सत्यासाठी आता सर्वोच न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. आणि त्याकडून प्रमाणपत्र आणावे लागावे लागत आहे. आजच्या काळात सत्याची परिभाषा काय आहे. हेच मूळात समजत नाही. गांधीजींचे मूलभूत तत्वच आता राहिली नाहीत. यशस्वी नेता व्हायचे असेल तर वेगळीच ओळख असावी लागते. आज समाजात नेता व्हीआयपी कल्चरचा झाला आहे. कदाचित आज बापूंनी हे स्वीकारले नसते, अशी भीती वाटते. जनता पण व्हीआयपी कल्चरलाच सलाम करते. पण त्यांच्या कामावर प्रभावित होत नाही. हे लक्षात ठेवा, की गांधीजी पुन्हा येणार नाहीत. आपल्यातूनच कोणाला तरी पुढे यावे लागणार आहे. या देशात आपल्यालाच क्रांती करावी लागेल.