नांदेड - जिल्ह्यात यंदा हळद लागवडीला सुरुवात झाली आहे. इसापूर आणि येलदरी धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे विहीर व बोअरमधील पाणीपातळी टिकून आहे. यामुळे, ठिबक सिंचनाचा वापर करून मान्सून येण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात हळदीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली असून शेतकऱ्यांनी ऊसाला पर्याय व नगदी पीक म्हणून याकडे पाहिले आहे. यंदाही पंचवीस हजार हेक्टरच्या वर लागवड होईल, असा अंदाज आहे.
नांदेड जिल्ह्यात ठिबक सिंचनाचा वापर करून हळद लागवड सुरू...! मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी केलीय सुरुवात -
हळद हे नऊ महिन्यात येणारे पीक आहे. पावसाळ्याच्या आगमनानुसार साधारणतः जून ते जुलैदरम्यान हळदीची लागवड केली जाते. मात्र, यावर्षी येलदरी आणि इसापूर धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे जमिनीची पाणीपातळी खोल न जाता विहीर व बोअरमधील पाणी टिकून आहे. लॉकडाऊनमुळे शेतीतील मजुरांची उपलब्धता आणि शेतकऱ्यांचा पूर्णवेळ यामुळे खरीप हंगामापूर्वीच शिवारे लागवडीसाठी सज्ज झाली आहेत.
पंचवीस हजार हेक्टरवर वाढ होईल असा कृषी विभागाचा अंदाज -
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व बोअरमध्ये पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे. गतवर्षी नांदेड जिल्ह्यात वीस हजार हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली होती. यंदा चांगल्या पावसाची शक्यता आणि धरणामधील मुबलक पाणीसाठा यामुळे हळदीच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन पंचवीस हजार हेक्टरवर लागवड केली जाईल, असा अंदाज कृषी विभागाकडून सांगण्यात आला आहे.