नांदेड - माहूरगड विश्वस्थांत महिलांना स्थान द्यावे तसेच मंदिरातदेखील महिला पुजारी नेमाव्यात, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. हा निर्णय लवकर घ्यावा, आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
'समानतेचा संदेश द्या'
साडे तीन शक्ती पीठांपैकी सर्व शक्ती पीठांत मंदिर ट्रस्टमध्ये ५० विश्वस्त महिला घेतल्या जाव्यात, तसेच पुजाऱ्यांमध्येदेखील जागा मिळावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून त्या नांदेड दौऱ्यावर आहेत. भोकर तालुक्यातील दिवशी येथील पीडित कुटुंबीयांची भेट त्यांनी घेतली. त्यानंतर माहूर गड येथे रेणुका मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिरात महिला पुजारी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
माहूरगड मंदिर ट्रस्टींची घेतली भेट
माहूर गडावरील रेणुका माता हीदेखील एक महिला आहे. मात्र तेथे पुरुष पुजारी पूजा करतात. पूजा करण्याचा अधिकार महिलांना का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. रेणुकामाता ट्रस्टमध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्यात याव्या आणि पुजाऱ्यांमध्ये देखील ५० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, तत्काळ हा निर्णय घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.