रत्नेश्वरी शिवारात साकारणार 'ऑक्सिजन वन' - tree plantation campaign news
लोहा तालुक्यातील रत्नेश्वरी शिवारात रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाच्या संयुक्त विद्यामातून अभिनव ऑक्सिजन वन उपक्रमातील वृक्षारोपणाचा शुभारंभ उद्या 10 जून रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
नांदेड - वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत लोकसहभागातून नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी उपक्रम हाती घेतले आहेत. यात लोहा तालुक्यातील रत्नेश्वरी शिवारात रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाच्या संयुक्त विद्यामातून अभिनव ऑक्सिजन वन उपक्रमातील वृक्षारोपणाचा शुभारंभ उद्या 10 जून रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
लोकसहभागातून वृक्षारोपणाला चालना
लोकसहभागातून वृक्षारोपणाला चालना मिळावी यावर जिल्हा प्रशासनाने विविध विभागाच्या समन्वयातून विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1 कोटी 26 लाख 82 हजार 824 एवढी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे. यापैकी 53 लाख 49 हजार झाडे उपलब्ध आहेत. उर्वरित झाडे सामाजिक वनीकरण, वन विभाग, कृषि, मनपा, रेशीम विभाग यांच्यामार्फत उपलब्ध केली जात आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर शुद्ध प्राण वायुच्या उपलब्धतेसाठी समाजातील सर्व घटकात अधिकाधिक जनजागृती व्हावी व त्यांचा वृक्ष लागवडीतून कृतीशील लोकसहभाग घेता यावा, यासाठी जिल्हा परिषद, वन विभाग, कृषि विभाग, शालेय शिक्षण विभाग या सर्वांच्या माध्यमातून नियोजन केले आहे.
कोरोनातून मुक्त झालेले नागरिक घेणार पुढाकार
जिल्ह्यात आजच्या घडिला एकूण 87 हजार 636 कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यातील बहुसंख्य बाधित या वृक्ष लागवडीतील लोकसहभागासाठी पुढे सरसावले आहेत. या दृष्टिने नांदेड जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहीम अभिनव ठरावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विविध विभाग प्रमुखांना सूचना देऊन त्यांचाही सहभाग यात घेतला आहे.
यांच्या हस्ते होणार शुभारंभ
या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिताताई देवरे, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंद शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, पंचायत समिती सदस्या सुकेशिनी कांबळे, वडेपुरीचे सरपंच गोपाळराव सावळे आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून होणार आहे.