नांदेड - कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या होणार की नाही या संभ्रामात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक माहिती समोर आली आहे. येत्या २६ जुलैपासून बदल्यांच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.
नांदेडमध्ये रविवारपासून जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेला सुरुवात
येत्या रविवार दि. २६ जुलैपासून बदल्यांच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेची सार्वत्रिक बदली प्रक्रिया म्हणजे मोठी चंगळच. या बदल्यांसाठी जमणाऱ्या गर्दीमुळे जिल्हा परिषदेचा परिसर गर्दीने फुलून जातो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूजन्य आजाराच्या काळात या बदल्या होणार किंवा नाही या संभ्रमात असलेल्या वर्ग 'क' व वर्ग 'ड' कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी मुहूर्त सापडला आहे. यंदा कोरोना नियमावली पाळत ह्या बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्यांसाठी बदलीपात्र कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी या काळात जिल्हा परिषदेत यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवार दि. २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कृषी व पशुसंवर्धन विभाग सार्वत्रिक बदल्या, सेवाज्येष्ठता यादीनुसार करण्यात येणार आहे.
सोमवार २७ जुलै रोजी आरोग्य विभाग, मंगळवार दि. २८ जुलै रोजी ग्रामपंचायत विभाग, बुधवार दि. २९ जुलै रोजी अर्थ विभाग, शिक्षक वगळून शिक्षण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गुरुवार दि. ३० जुलै रोजी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा बाजार जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भरणार आहे. ही बदली प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चालणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ही सर्व प्रक्रिया कोरोनाविषयक नियमावलीच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.