महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेमविवाहाचा करुण अंत : पतीची विष पिऊन तर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या..! - प्रेमविवाहातून पती-पत्नीची आत्महत्या

अनैतिक संबंधाच्या संशयातून एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला आहे. घरच्यांचा विरोध पत्करून पाच वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलेल्या दाम्पत्याने आपले जीवन संपविल्याने दोन चिमुरडी पोरकी झाली आहेत. ही घटना हदगाव तालुक्यातील तरोडा येथे घडली.

tragedy of love marriage
प्रेमविवाहाचा करुण अंत

By

Published : Nov 18, 2020, 4:54 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील तरोडा (ता.हदगाव) येथील एका दाम्पत्याच्या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले आणि त्याचा शेवट दोघांचा जीव जाण्यात झाला. दोन पोरं आई-बाबांना पोरकी झाली आहेत. दोन कुटुंब आपल्या पाल्यांना गमावून बसली. ऐन दिवाळी सणात ही हृदयद्रावक घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून टोकाची भूमिका -

सुभाष लक्ष्मण बोरकर व प्रेमिला यांनी घरच्या मंडळीचा विरोध पत्करुन पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पळून गेल्यामुळे दोघांच्या घरचा विरोध, हाताला काम नाही अशा परिस्थितीत मित्रांच्या मदतीने औरंगाबाद गाठले व कंपनीत कामही मिळाले. दोघांचा संसार सुरु झाला व त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलं झाली. लग्नानंतर पाच वर्षे सुखात गेल्यानंतर त्यांच्या प्रेमाला संशयाचे ग्रहण लागले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सुभाषला आला. त्यामुळे जिच्यासाठी घर सोडले, आई-बाबा सोडले तिने धोका दिल्याची शंका आल्याने सुभाषने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

मृत प्रेमिला बोरकर
पतीने विष पिऊन केली आत्महत्या -
दिवाळीचे निमित्त करून हे कुटुंब औरंगाबादहून ११ नोव्हेंबरला गावी तरोडा (ता. हदगाव) येथे आले. पसारा घरी टाकला व रात्रीच्या वेळी सुभाषने घरात वादास सुरूवात केली. प्रेमिलाने मला धोका दिला आहे, मला जगायचे नाही, असं म्हणाला. सकाळी उठून पती-पत्नी औरंगाबादला जातो म्हणून गेले. पण सुभाषच्या वागण्याचा नातेवाईकांना संशय आल्यामुळे ते लगेच त्याचा पाठलाग करीत गेले. बामणीफाटा येथे त्याने एका कृषी-केंद्रावर विषारी औषध घेतल्याची माहिती नातेवाईकांना मिळाल्याने ते घाबरुन गेले. त्यांनी मनाठा पोलिसांना याची सूचना दिली. दाम्पत्य जात असलेल्या लक्झरी बसचा नांदेडपर्यंत पाठलाग केला. पण ते दोघे भुवनेश्वर (ता.कळमनुरी) येथेच उतरले. दोघांनी गप्पा मारल्या. सुभाषने स्वत:चा व्हिडिओ बनविला व त्याने अर्धालिटर विषारी द्रव्य पिले. ही घटना गुरुवारी दि.१२ नोव्हेंबरला घडली. शोधाशोध केल्यानंतर दोन दिवसांनी सुभाषचा मृतदेह आढळला.
पत्नीने घेतला गळफास -

सुभाषचा मृतदेह मिळाला मात्र पत्नी प्रेमिला मिळाली नव्हती. ती औरंगाबादला गेली असेल, की तिनेही सुभाषसारखे टोकाचे पाऊल उचलले असेल? अशी शंका व्यक्त केली जात होती. पण तिचा शोध लागला नाही. बाळापुर ठाण्याअंतर्गत भुवनेश्वरला सुभाषने आत्महत्या केल्याने तपास सुरु होता. दोन दिवसांनंतर भुवनेश्वर जवळील कॅनाल रस्त्यालगत प्रेमिलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

दोन मुलं झाली पोरकी -

एक आठवड्यानंतर प्रेमिलाचा मृतदेह आढळला. प्रेमी युगलाचा करुण अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. दोन मुलं आई-बाबांना पोरकी झाली तर दोन आई-बाबा दोन मुलांना (सुभाष प्रेमिला) पोरकी झाली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details