नांदेड -लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याला कवडीमोल दर लागल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाला शेतात नासाडी झाला तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यातच जिल्ह्यातील पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्याला मात्र लॉकडाऊन मध्येही टमाट्याच्या शेतीने आधार दिला आहे. थेट शेतातूनच विक्री होत आहे.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म.) येथील तरुण शेतकरी सुनील कदम यांचे नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर शेत असून जून महिन्यात दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. आता ती काढणीस सुरुवात झाली आहे. तर टोमॅटोला चांगला दर मिळू लागल्याने दोन एकरात सात ते आठ लाखाचे उत्पादन अपेक्षित आहेत. टमाट्यातून भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याला आधार दिला आहे.
अर्धापूर तालुक्यात बहुतांशी शेतकरी केळी, ऊस, कापूस आणि सोयाबीन यासारखे पारंपरिक पिके घेतात. ईसापूर धरणाच्या पाण्यावर संपूर्ण तालुका ओलीताखाली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करतात. तर अनेक शेतकरी भाजीपाला पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. उन्हाळ्यात लग्न समारंभ व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.पण सदरील कार्यक्रम बंद असल्याने भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळाल्याने अनेक शेतकरी भाजीपाला पिकांकडे पाठ फिरवली होती.