नांदेड श्रावण वद्य अमावस्या बैलपोळा Bullock festival म्हणून ओळखला जातो. बैलपोळा Bail pola, नंदी पोळा Nandi Pola आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. तर महाराष्ट्रासह देशातील विविध भागात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो.
अशी आहे परंपराग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतांगायत चालू आहे. गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. आश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणार्या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत. सोडण्यापूर्वी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात तू वासरांचा पिता अशा अर्थाचा मंत्र म्हणत. हा तुमचा पती आहे. अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघगर्जनेसारखी असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे, असे मत्स्य पुराणात सांगितले आहे.