नांदेड - कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प होण्याचे सावट आहे. जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला आता घाऊक खरेदीदार भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेल्या टरबूजांचे नेमके काय करावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर टरबूज फेकण्याची वेळ आली आहे.
केलेला खर्च आता वाया जाणार -
शेतातील टरबूज काढणीस आल्यानंतरही खरेदीदार व्यापारी टरबुजांची ठोक खरेदी करण्यास तयार नाही. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आता घाम फुटला आहे. पीक घेण्यासाठी मागील काही महिन्यांपासून घेतलेली अहोरात्र मेहनत व केलेला खर्च आता वाया जाईल. या चिंतेत टरबूज उत्पादक शेतकरी सापडले आहेत. टरबुजाचे पीक ठराविक कालावधीत काढले नाही, तर हे हातचे जाणार हे निश्चित झाले आहे. तसेच तीन ते चार रुपयांपर्यंत दर खाली उतरले आहेत. व्यापाऱ्यांना देणेही परवडत नसून खर्च निघणेही अवघड होऊन बसले आहे.
व्यापारी मिळत नाहीत -
कवडीमोल भावाने विक्रीस तयार झालेल्या टरबूजांना ठोक खरेदीदार व्यापारी भेटत नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी टरबुजांची तोडणी करून विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यालाही प्रतिसाद मिळत नाहीत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कवडीमोल भावाने टरबुजांची बीटमध्ये विक्री करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी -
दोन एकरावर टरबुजाची लागवड केली आहे. हे पीक आता काढणीस तयार झाले असून कोरोना आजारामुळे बाजारपेठेत प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे टरबूजांच्या ठोक खरेदीदारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असून टरबूज लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षीही मोठे नुकसान झाले, यावर्षीही तीच परिस्थिती आहे. आम्ही प्रचंड अडचणीत सापडलो आहोत. तरी शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संभाजी देशमुख तरोडेकर यांनी केली आहे.
हेही वाचा - नवरी मिळे नवऱ्याला! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युवकावर लग्नाच्या प्रस्तावांचा अक्षरश: वर्षाव