नांदेड-शहरातील श्रीनगर भागातून मुदखेड येथे दुचाकीवरुन प्रवास करणार्या शिक्षकावर तीन अज्ञातांनी हल्ला केला. ही घटना मालटेकडी येथील उड्डाण पुलाजवळ घडली. आरोपी उड्डाणपुलाखाली दबा धरुन बसलेले होते. या हल्ल्यात शिक्षक सदाशिव बोकारे (वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
शिक्षकावर तीन अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल..! - अज्ञाताकडून शिक्षकावर प्राणघातक हल्ला
सदाशिव बोकारे शुक्रवारी दुपारी मुदखेड वरुन शहरात येत असताना मालटेकडी येथील उड्डाण पुलाजवळ तीन अज्ञातांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदाशिव शंकरराव बोकारे ( वय ३५) हे नांदेड शहरातील श्रीनगर भागात वास्तव्यास आहेत. मुदखेड येथील राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे ते मुदखेड येथून दुचाकी क्रमांक MH 26 AB 8799 ने नांदेड येथे येत असताना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान, कामठा नजीक मालटेकडी उड्डाण पुलाखाली दबा धरुन बसलेल्या आरोपींनी लोखंडी राँडने डोक्यावर व पायावर हल्ला केला. यात बोकारे गंभीर जखमी झाले.
आरोपींनी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीने नमस्कार चौकाकडे पलायन केले. त्यानंतर शिक्षक बोकारे यांचे सहकारी असलेल्या राम बुद्धेवार यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बोकारे यांना विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सदाशिव बोकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 326, 341, 34 हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.