नांदेड- जिल्ह्यात पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे जायकवाडी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून १३ हजार ६२४ क्युसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. तर पाण्याचा येवा सुरुच असल्याने हे पाणी कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयात पोहचले आहे त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे ३ दरवाजे उघडण्यात आले असून यामधून १३४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
हेही वाचा - राज्यभरात पुराचा कहर... पीकं जमीनदोस्त; तर शेतांना तळ्याचे स्वरुप!
राज्यभरात दोन दिवस परतीच्या मान्सूनने हाहाकार माजला. काही ठिकाणी ढगफुटी झाली तर, अनेक भागांत मुसळधार पावसाने सगळ्यांना झोडपले. शहरे तुंबली तर अनेक गावांचा संपर्क तुटला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली. यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून झाला आहे.
परिणामी, जायकवाडी प्रकल्पातील पाणी पातळी वाढल्याने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत असून मांजरा तसेच पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मात्र, आता पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होवू शकते. सद्यस्थितीत नांदेड शहरातील पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. नांदेडकरांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातून सध्या १३४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून सद्यस्थितीत पाणी पातळी ३५४.७० वर पोहचली आहे. तर जुन्या पुलावर पाणी पातळी ३४५.१८ मीटर आहे. इशारा पातळी ३५१.८० तर धोका पातळी ३५४ मीटर आहे. इशारा पातळीचा विसर्ग २ लाख १३ हजार क्युसेक तर धोका पातळीचा विसर्ग ३ लाख ९ हजार ७७४ क्युसेक एवढा आहे.