नांदेड Hemant Patil Threat Call : 14 डिसेंबर रोजी खासदार हेमंत पाटील दिल्लीमध्ये असताना दहा वाजून आठ मिनिटांनी त्यांना इंग्रजीमधून फोन आला होता. सकृतदर्शनी फोन युनायटेड किंगडममधून आल्याचं दिसत होतं. साधारणतः ५८ सेकंद ती व्यक्ती बोलली होती. '13 डिसेंबर रोजी हिंदुस्तानला आम्ही दाखवून दिलं आहे आमची ताकद. येत्या 26 जानेवारीला आम्ही मोठे धमाके करणार आहोत. यामध्ये तुम्ही स्वतःला वाचू शकत असाल तर वाचून दाखवा' अशा प्रकारची धमकी दिली होती.
हेमंत पाटील यांना तीन कॉल :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी योग्य त्या सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबर रोजी खासदार हेमंत पाटील यांना तीन कॉल आले होते. यामध्ये हेमंत पाटील यांनी ते कॉल उचलले नाहीत. पण ते कॉल इजिप्त देशातून आले होते. यासंदर्भात लेखी स्वरूपात ही माहिती लोकसभा अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि देशाचे गृहमंत्री यांना लिखित स्वरूपात दिली आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना माहिती देण्यात आली असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितलं.
खासदार हेमंत पाटील यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हेमंत पाटील यांच्या माहितीनुसार, परदेशातून धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणात तपास सुरू आहे - श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड