महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या आसना नदी पात्रात रसायनयुक्त पाणी, हजारो मासे मृत्युमुखी

शहराच्या आसना बायपास परिसरातून वाहणाऱ्या आसना नदी पात्रात पूर्णा, वसमत या भागातील साखर कारखान्यांचे मळीयुक्त व रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदी दूषित झाली. याचा फटका जलचर प्राण्यांना बसला असून हजारो मासे मृत्युमुखी पडले.

By

Published : Jul 7, 2022, 9:04 AM IST

Nanded Asana river fish death
नांदेड आसना नदी मासे मृत्यू

नांदेड - शहराच्या आसना बायपास परिसरातून वाहणाऱ्या आसना नदी पात्रात पूर्णा, वसमत या भागातील साखर कारखान्यांचे मळीयुक्त व रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदी दूषित झाली. याचा फटका जलचर प्राण्यांना बसला असून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः भेट देऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली.

हेही वाचा -Son Killed Father In Nanded : पोटच्या मुलांनीच केला वृद्ध पित्याचा खून; लोहा तालुक्यातील घटना

मागील दोन वर्षांपूर्वी गोदावरी पात्रात रसायनयुक्त पाणी मिसळल्याने गोवर्धन घाट पूल परिसरात हजारो माशांचा जीव गेला होता. पर्यावरण व प्रदूषण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दूषित पाण्यामुळे या माशांचा जीव गेल्याचा अहवाल महापालिकेला मिळाला होता. त्यानंतर या प्रकरणात पुढे काय झाले याची माहिती जाहीर झाली नाही. असाच प्रकार मंगळवारी 6 जूलै रोजी सायंकाळच्या सुमारास आसना नदी पात्रात आढळून आला आहे. आसना नदीचे पाणी आलेल्या पुरामुळे अचानक लाल व काळे झाले. हा प्रकार नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी आणि मासेमारांसाठी आश्चर्यकारक होता. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि वसमत येथील साखर कारखाने सध्या बंद झाल्याने जून महिन्यामध्ये सर्व कारखान्यातील मशीनची साफसफाई केली जाते. तसेच या परिसरात साखर कारखान्यांची मळी मोठ्या प्रमाणात साचत असते. वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पूर्णा आणि दुधना नदींना पूर आला व पुराचे पाणी, रसायनयुक्त दूषित पाणी आसना नदीत मिसळले. त्यामुळे आसना दूषित झाली.

या नदीपात्रात हजारो माशांसह अन्य जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागला. तसेच ब्राह्मणवाडा, त्रिकूट, आमदुरा, दिग्रस या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांनाही या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता सायन्स महाविद्यालयाचे मत्स्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी व्यक्त केली असून, या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. आसना नदी पात्रात रसायनयुक्त पाणी मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे, जलचर प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती संबंधित विभागांकडून मागवली असून, लवकरच यातील नेमक्या कारणांचा उलगडा होणार आहे. सध्या तरी आसना नदीपात्रातून अक्षरशः लाल व काळेभोर पाणी नदी पात्रात विसर्जित होत आहे.

हेही वाचा -अशोक चव्हाणांना राज्य सरकरचा दणका, डीपीडीसीच्या ५६७ कोटींच्या कामाला स्थगिती

ABOUT THE AUTHOR

...view details