नांदेड - सिडको परिसरातील दत्तनगर भागात भरवस्तीतील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने मिळून जवळपास २ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून घटनास्थळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले असता श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. केशव पुंडलिक कोलते हे नेहमीप्रमाणे यशोसाई रुग्णालयात रात्रपाळी कामासाठी गेले होते. तर, त्यांची पत्नी मुलासह दुपारीच माहेरी गेली असल्याने त्यांचे घर बंद होते. दरम्यान, सुरेश लांडगे यांनी कोलते यांना भ्रमणध्वनीवरून घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कोलते यांनी तत्काळ निवासस्थान गाठले. यावेळी त्यांना त्यांना दोन्ही कपाटाची दारे उघडी असलेली दिसली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी करून पंचनामा केला.