नांदेडकुष्णूर औद्योगिक वसाहतीतील हेमाडपंथी महादेव मंदिरात ( Hemadpanti Mahadev Temple ) अज्ञातांनी महादेवाची पिंड बाजूला सरकवून उत्खनन केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून सदरची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे ( Kuntur Police Station ) सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे घटनास्थळी पोहचले. श्वान पथकासह ठसे तज्ञांची टिम हजर झाली, पण काहीही धागादोरा सापडला नाही. सदरचे उत्खनन हे धनाच्या लालसेने करण्यात आल्याची चर्चा होत आहे.
आजपर्यंत अनेकदाउत्खनन नायगाव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीत एका औषध कंपनीच्या जवळ ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. यापुर्वी मंदिराच्या आजुबाजूला अनेकवेळा उत्खनन झाले असून, याबाबत तेथील नागरिक आजही सांगत आहेत. जे आजुबाजूला उत्खनन झाले, ते केवळ गुप्तधन काढण्यासाठीच करण्यात आल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मंदिराच्या बाहेर आजपर्यंत उत्खनन झाले असल्याने, या भागातील नागरिकांनी याबाबत गांभीर्याने घेतले नव्हते. पण सकाळी थेट मंदिराच्या गाभाऱ्यातच महादेवाची पिंड बाजूला करुन उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खळबळ तर उडालीच, पण महादेवाची पिंड अस्तव्यस्त करत उत्खनन केले असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.