नांदेड - लॉकडाऊनमुळे सध्या दारूविक्री बंद आहे. मात्र, तळीराम आपला घसा ओला करण्यासाठी अनेक मार्ग धुंडाळत आहेत. यामुळेच चारपट अधिक दराने दारूची विक्री होताना दिसते. तर दुसरीकडे दारूची दुकाने फोडण्याच्या घटना देखील घडत आहेत. नांदेडमध्ये गोपाळचावडी या ठिकाणी आज (रविवारी) एक देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल 900 लीटर दारू लंपास केली आहे.
दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी पळवली तब्बल 900 लीटर दारू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत संचारबंदी असतानादेखील नांदेड जिल्ह्यातील गोपाळचावडी या ठिकाणी दारूचे दुकाने फोडण्यात आले आहे. चोरट्यांनी दुकान फोडून तब्बल 900 लिटर दारू लंपास केली आहे.
हेही वाचा...लाॅकडाऊन: रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...
चोरट्यांनी दुकानाचे टाळे उघडल्यानंतर सर्वप्रथम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेराची सर्वात आधी तोडफोड केली. त्यानंतर दुकानातील दारू पळवली. दुकानातील इन्व्हर्टर आणि बॅटरी यांचीदेखील चोरी झाली आहे. लॉकडाऊनमध्ये पोलीस बंदोबस्त असूनही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या चोरीत पाच लाखांचा मुद्देमाल गेल्याचे सांगण्यात येते आहे. दुकानाचे मालक शंकर गाडगे यांनी याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.