नांदेड- जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणू बाबत नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळावरही खबरदारी घेतली जात आहे. विमानाने नांदेडला येणाऱ्या प्रवाश्याची थर्मल टेस्ट मशीनद्वारे तपासणी केली जात आहे.
मंगळवारी विमानाने मुंबईहून नांदेडला आलेल्या 50 प्रवाशांची महापालिकेच्या डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. या प्रवाशांमध्ये कोरोनाचे कुठलेही लक्षण दिसून आले नाही. पण, एक प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून आल्याचे निदर्शनास आले. त्या प्रवाशाची तपासणी केली असता, त्यातही कोरोनाचे कुठलेही लक्षण आढळून आले नाही.
विमानतळावरच प्रवाशांची तपासणी, विदेशातून आलेल्यांच्या हातावर शिक्के विशेष म्हणजे विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या हाताला डॉक्टरांकडून होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत महापालिकेच्या डॉक्टरांकडून प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिह बिसेन यांनी दिली.
दरम्यान, कोरोनामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमी झाली आहे. देशभरात कोरोना वाढत असल्याने विदेशात आणि बाहेर राज्यात शिकत असलेले विद्यार्थी मोठया प्रमाणात नांदेडला परतत आहेत. मंगळवारी 50 प्रवाशांपैकी 40 जण विद्यार्थी होते.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील न्यायिक कामकाजाच्या वेळेत बदल