नांदेड - कोरोना संक्रमण काळातही विजबिले भरू न शकलेल्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत न करता नांदेड परीमंडळाने 32 कोटी 26 लाख रुपयांच्या वीज देयकांची वसुली केली आहे. नांदेड विभागातील ग्राहकांनीही महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली नांदेड परिमंडळात झाली आहे.
वीजबिल वसुलीला प्रतिसाद; मराठवाड्यातील नांदेड विभागाची 32 कोटींची वसुली
कोरोना संक्रमण काळातही मराठवाडा विभागातून सर्वाधिक वीजबिलांची वसुली नांदेड परिमंडळात झाली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत न करता नांदेड परीमंडळाने 32 कोटी 26 लाख रुपयांच्या वीज देयकांची वसुली केली आहे.
नांदेड विभागातील ग्राहकांनीही महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली नांदेड परिमंडळात झाली आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांनी 24 सप्टेबर अखेर 5 कोटी 1 लाखांचा भरणा केला आहे. येलो झोन मधील 13 उपविभागातील वीज ग्राहकांनी 14 कोटी 78 लाखांचा भरणा केला आहे. त्याच बरोबर रेड झोन मधील 10 उपविभागातील वीज ग्राहकांनी 12 कोटी 37 लाखांचा वीजबिल भरणा केला आहे.
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या संकल्पनेतून सुसंवादाची मोहीम राबविली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीजबिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडून कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत नाही. वीज ग्राहकांनी वीजबिले भरण्यासाठी स्वत:हून पुढे यावे, यासाठी विनंती, सुचना, पत्रव्यवहार, व्हॉटसअॅप, एसएमएस व प्रत्यक्ष भेट घेवून सुसंवाद साधण्याच्या सुचना डॉ. नरेश गिते यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर थकबाकी वसुली करणे सोपे व्हावे, यासाठी रेड, यलो आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी करून टॉप 100 ग्राहकांची यादी तयार करून देण्यात आली होती. यानुसार वीज ग्राहकांना कसल्याही प्रकारचा त्रास न देता सुसंवाद साधत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्राहकांनीही या मोहिमेस प्रतिसाद देत वीज देयकांचा भरणा केला आहे.