राज्यात सर्वाधिक विमा परतावा नांदेडला.. ४५८ कोटी मंजूर, प्रशासनासह विमा कंपनीची तत्परता
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी ८९ लाखांचा विमा परतावा नांदेडला मंजूर झाला आहे.
नांदेड -जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी ८९ लाखांचा विमा परतावा नांदेडला मंजूर झाला आहे. या कामात प्रशासनाने विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांकडून आलेल्या पूर्वसुचनाचे सर्वे त्वरीत संपवून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी परतावा मिळण्याची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील खरिप पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेत इफ्को टोकियो जनरल इन्सूरन्स कपंनीच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२१-२२ साठी नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामाच्या काळात प्रारंभी २२ दिवसाचा खंड पडला. यावेळी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढून शेतकऱ्यांना आगाऊ पंचवीस टक्के भरपाई देण्याची भूमका घेतली. परंतु यानंतर ऑगस्ट तसेच सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी होवून पूरस्थिती उद्भवली. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी कंपनीला नुकसानीबाबत पूर्वसुचना देण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यानुसार तब्बल चार लाख पूर्वसुचना दाखल झाल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सर्वे तत्काळ पूर्ण करुन शंभर टक्के विमा परतावा मिळावा, अशी भुमिका घेतली. यात वेळोवळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करुन परतावा मंजुरीचे काम केल्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक ४५८ कोटी विमा परतावा विक्रमी वेळेत मंजूर झाला आहे. यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सहा पिकांसाठी भरला विमा -
जिल्ह्यातील नऊ लाख १० हजार ९४१ अर्जदार शेतकऱ्यांनी उडीद, मुग, तूर, कापूस, ज्वारी व सोयाबीनसाठी ४४ कोटी ९५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २९४ कोटी ९२ लाख ४७ हजार ९०१ रुपयानुसार विमा कंपनीकडे जिल्ह्यात प्रिमीयम ६३० कोटी ८० लाख ३४८ रुपये जमा होणार आहेत. यातून पाच लाख १६ हजार ९५१ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. तर विमा संरक्षित रक्कम दोन हजार १६२ कोटी ८६ लाख निर्धारीत करण्यात आली होती.
सर्वांच्या मेहनतीचे फळ- डॉ.विपीन
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर विमा परतावा मिळावा, यासाठी कृषी विभागासह विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. यामुळे कमी वेळेत राज्यात सर्वाधिक विमा नांदेडला मंजूर झाल्याचे समाधान आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली.
जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादकांचा समावेश- जिल्हा कृषी अधीक्षक
नांदेडला मंजूर झालेल्या विमा परताव्यात जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. यानंतर पिक कापणी प्रयोगाच्या आधारावर उत्पादन आधारीत नुकसान भरपाइ घटकातंर्गत काही प्रमाणात का होईना परंतु मंजूर होणाऱ्या परताव्याकडे लक्ष आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी रविशंकर चलवदे दिली आहे.