नांदेड - लोकांनी आपल्याला उसने घेतलेले पैसे परत मागू नयेत म्हणून शहरातील एका व्यक्तीने चांगलीच शक्कल लढवली. या व्यक्तीने आपली साडेआठ लाख रुपयांची बॅग दरोडेखोरांनी चोरली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी या व्यक्तीचे पितळ उघडे पाडले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर बॅग चोरीला गेलीच नाही, हे स्पष्ट झाले. परंतु, या तक्रारीनंतर पोलिसांचीही काही काळ चांगलीच तारांबळ उडाली होती. या व्यक्तीचे नाव गणेश उत्तम पतंगे (रा. सोमेश कॉलनी) असे आहे.
पोलिसांनी केली होती नाकाबंदी
या व्यक्तीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आपली बॅग चोरीला गेली अशी तक्रार दिली. यानंतर पोलीसांनी तातडीने नांदेडच्या चारही दिशांना जलदगतीने नाकाबंदी केली. तसेच, आसपासची दुकाने बंद करणे सुरू असल्याने, व्यापारी वर्गाचीही धांदल उडाली होती. पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, अभिमन्यु साळुंके, संजय ननवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी या भागात आले होते.