नांदेड -कंधार तालुक्यातील उस्माननगर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मजुरांच्या कॅम्पला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक यंत्रणा व गावकऱ्यांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
कंधार तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उस्माननगर परिसरात काथलिया कन्स्ट्रक्शन या बांधकाम ठेकेदाराच्या मजुरांचा कॅम्प आहे. या कॅम्पमधील मजूर नुकतेच घराकडे परतले आहेत. त्यामुळे मोठा अपघात टळलाय.
शुक्रवारी (१५ ) सायंकाळी अचानक या बांधकाम साईटवरील कॅम्पला भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. ही घटना कळताच उस्माननगरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तत्काळ अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. बराच वेळ आग विझवण्याचे काम सुरू होते. संबंधित घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरिही काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र प्राथमिक अंदाजनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती मिळत आहे.