नांदेड - तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी एकरी 10 हजार रुपये देतो. तसेच 24 तास मोफत वीज शेतकऱ्यांना दिली जाते. एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 5 लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. मग अशा सर्व सोयीसुविधा आम्ही देऊ शेतकऱ्यांना देऊ शकतो तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही, असा सवाल केसीआर यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे सरकारवर टीका - केसीआर यांनी लोहा येथील सभेत महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यापुढे महाराष्ट्रातील शेतकऱयांना आमचा बीआरस पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. ज्या सुविधा आम्ही आमच्या राज्यातील शेतकऱयांना देतो मग तशा सुविधा महाराष्ट्रातील शेतकऱयांना हे राज्य सरकार का देत नाही, असा सवाल केसीआर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार - तेलंगाणाचा मुख्यमंत्री यांनी आता आपला पुढील मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. याआधीही केसीआर यांची नांदेडमध्ये एक जाहीर सभा झाली होती. त्यावेळी देखील केसीआर यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राज्य सरकारवर टीका केली होती. आता आज(26 मार्च) केसीआर यांची नांदेडमध्ये दुसरी सभा झाली. यावेळीही त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुद्दे मांडत शिंदे - फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार असल्याचे, केसीआर यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांना टोला - देवेंद्र फडणवीस मला म्हणाले तुमचे काम तेलंगाणामध्ये असून, महाराष्ट्रत नाही. तुम्ही तिकडे पाहा, असे फडणवीस म्हणाले होते. मी भारताचा नागरिक आहे. मी भारताच्या नागरिकांसाठी काम करणार आहे. मी महाराष्ट्रात येणार नाही. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज मोफत, पाणी मोफत, शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये, तेलंगाणा राज्यात ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्रातील जनतेला देण्यात येतील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे तर मी महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही. या सर्व योजना महाराष्ट्रातील जनतेला मिळाल्यास मला महाराष्ट्रात येण्याची गरज नाही, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले.