नांदेड - बीआरएस प्रमुख व तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आज नांदेडमध्ये आले होते. पक्षाचे नाव बदलल्यानंतर केसीआर यांनी महाराष्ट्रात आज पहिली जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर केसीआर यांनी आज प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली.
कंपन्या सरकारला ब्लॅकमेल करतील - भारताकडे 361 अब्ज टन कोळशाचे साठे आहेत, आमच्याकडे इतकी संसाधने आहेत तरीही आम्ही खासगी कंपन्यांकडे वळत आहोत. यात अदानी पॉवर, अंबानी पॉवर या खासगी कंपन्यांकडे केंद्र सरकारला जाण्याची गरजच नाही. जर संपूर्ण वीज क्षेत्राचे खासगीकरण केले, तर कंपन्या सरकारला ब्लॅकमेल करतील, असे म्हणत केसीआर यांनी सध्या सुरू असलेल्या अदानी शेयर्स वादावरुन सरकारला धारेवर धरले.
अबकी बार किसान सरकार - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पर्यात नसतो तेव्हाच माणूस आत्महत्या करतो. यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही. शेतकरी आत्महत्यांबाबत महाराष्ट्र अव्वल आहे याचे दु:ख आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, तर राजकीय नेते विधानसभेत आणि संसदेत भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ‘अबकी बार किसान सरकार’, अशा नारा बीआरएस पार्टीने दिला आहे, असेही केसीआर म्हणाले.
एकजूट होण्याची गरज - सध्या देशातील राजकीय वातावरण खूप बदलले आहे. त्यामुळे आता देशात परिवर्तनाची आवश्यता आहे. देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली आहेत. यादरम्यान देशात अनेकदा सरकारे बदलली. सर्व सरकारांनी निवडणुकीदरम्यान मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही, वीज मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता यासाठी एकजूट होण्याची गरज आहे, असे के.चंद्रशेखर राव नांदेडमध्ये म्हणाले.
भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडा - मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील पाणी समस्येवर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा अजेंडाही सांगितला. ते म्हणाले, विचारधारा बदलली तर भारत बदलेल. भारताला बदलण्यासाठी आमचा पक्ष खूप प्रयत्न करेल. देशात लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकजूट होण्याची गरज असल्याचे केसीआर म्हणाले.