महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापालिका व कंत्राटदारातील बेबनावामुळे कोरोना वॉरियर्सवर उपासमारीची वेळ - sweepers facing problems

आर अॅण्ड बी व्यवस्थापनाने मनपासोबत कचऱ्याच्या वजनानुसार मोबदल्याचा करार केला आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील बाजारपेठ बंद असल्याने या करारातील किमान वजनाएवढाही कचरा सध्या कंपनीला उपलब्ध होत नाही. लॉकडाऊन काळात सरासरी वजन धरून कंपनीला मोबदला दिल्यास कामगार कपातीची गरज भासणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.

nanded municipal corporation
नांदेड महापालिका

By

Published : May 20, 2020, 4:33 PM IST

नांदेड -महानगरपालिका प्रशासन व कंत्राटदारातील बेबनावामुळे कोरोना वॉरियर्स असलेले कंत्राटी सफाई कामगारांवर रोजगार जाण्याची व उपासमारीची वेळ आली आहे. मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतः व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता अल्पपगारात कंत्राटी सफाई कामगार काम करीत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व कंत्राटदार कंपनी आर अॅण्ड बी कंपनीतील बेबनावामुळे या कामगारांना रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.

कोरोना वॉरियर्स सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ

काही दिवसांपूर्वी 'स्वच्छता दूत', कोरोना वॉरियर्स म्हणून सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सफाई कामगारांचा ठिकठिकाणी गुलाब पुष्प, जीवनावश्यक वस्तू, सुरक्षा सामग्री देऊन गौरव केला गेला. आता त्याच सफाई कामगारांना नोकरी गमावावी लागत आहे तर, काही कामगारांच्या वेतनात चक्क ५० टक्के कपात केली जात असल्याचे पुढे येऊ लागले आहे.

नांदेड मनपाचा स्वच्छता विभाग आणि कंत्राटदार नेहमीच चर्चेचा ठरले आहेत. एकीकडे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि स्थानिक पुढारी कोरोनाच्या काळात कामगारांना कमी करू नका, असे वारंवार सांगत आहेत. तर दुसरीकडे आर अॅण्ड बी कंपनीने कामगार कपात सुरू केली आहे. या संदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क केला असता मनपासोबत आपला कचऱ्याच्या वजनानुसार मोबदल्याचा करार झालेला आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील बाजारपेठ बंद असल्याने या करारातील किमान वजना एवढाही कचरा सध्या कंपनीला उपलब्ध होत नाही, असे सांगण्यात आले.

मनपा प्रशासनाने लॉकडाऊन काळात सरासरी वजन धरून कंपनीला मोबदला दिल्यास कामगार कपातीची गरज भासणार नाही, अशी मागणी आपण मनपा प्रशासनाकडे एप्रिल संपताच केली होती. प्रशासनाने या मागणीच्या पत्रांना केराची टोपली दाखवल्याने कामगार कपातीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details