नांदेड - सध्या देशभरात हनुमान चालिसा, मशिद भोंग्यावरुन वाद सुरु आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर आम्ही कुठंही नमाज पडू, हनुमान चालिसा म्हणू, असे राजू शेट्टींनी म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना शेट्टींनी राज्यातील महत्वाचे प्रश्न बाजूला पडू लागले आहेत. नको त्या गोष्टींवरुन वाद निर्माण केला जात आहे. त्यातून धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
राजू शेट्टींचा राज ठाकरेंवर निशाणा बळीराजा हुंकार यात्रा नांदेडमध्ये -बळीराजा हुंकार यात्रेनिमित्त ते नांदेड मध्येआले असता , ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, सरकार तसेच राज्य सरकारने शेतकरी विरोधी घेतली भूमिका आहे, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दोन्ही सरकार विरोधात अस्वस्थता असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या गावापासून १६ एप्रिल पासून सुरू झालेली बळीराजा हुंकार यात्रा नांदेडात पोहोचली. तत्पूर्वी राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाव वाढल्याचा फायदा शेतकऱ्यांना नाही - सोयाबीन, कापसाला भाव चांगला मिळाला, परंतु शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. विमा कंपन्यांनी सरकारी अधिकारी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून पीक कापणीची खोटे रेकॉर्ड तयार केले. यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे विमा कंपन्या दिवाळखोरीत निघतील असे असताना विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
शेतकरी प्रचंड अडचणीत -इंधनावरील खर्च वाढला, यासोबतच भारनियमनामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. नैसर्गिक साधन सामग्रीत सर्वांचा समान अधिकार असताना शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीज तेही रात्रीच्या वेळी दिली. इतरांना मात्र २४ तास वीज दिली जाते. राज्यात विजेची टंचाई नाही. ऊस एफआरपीबाबत केंद्राचा कायदा असताना राज्य शासनाने त्यात हस्तक्षेप करून एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा घाट घातला. यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न असल्यामुळे याबाबत पुढच्या वर्षी आंदोलन करू. शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांत सरकारविरोधी भावना असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत सांगितला एक किस्सा - एकादशी दिवशी पंढरपुरात जमलेले लाखो भाविक पांडुरंगाचं दर्शन झालं की, जेवणासाठी चंद्रभागेच्या वाळूवर बसतात. तेथील मोकाट कुत्र्यांना त्या भाकऱ्यांवर फडशा पाडायचा असतो. मात्र, तिथं वारकरी असल्यानं कुत्र्यांना भाकऱ्या मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. ही कुत्री एकमेकांत भांडतात. भुकूंन-भुकूंन कालवा करतात. भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना हे पाहवत नाही. ते त्या कुत्र्याचं भांडण सोडवायला उठतात. त्याचवेळेस कुत्रे वारकऱ्यांची भाकरी घेऊन पसार होतात, अशीच काहीशी अवस्था आज महाराष्ट्रात झालीय , असं शेट्टींनी नमूद केल. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सपशेल फेल गेल्याचंही त्यांनी म्हटल आहे.
यांची होती उपस्थिती - यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, किशनराव कदम, बालाजी कल्याणकर, शंकरराव राजेगोरे, आनंद लोंढे, सतीश ढाकणीकर, मारोतराव भांगे आदी उपस्थित होते.