नांदेड :यावेळी प्रश्न-उत्तरामध्ये 'धर्म में राजकारण और राजकारण मे धर्म' याविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. कौठा मैदानावर बुधवारी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी श्री श्री रविशंकर यांच्या सत्संगाला प्रारंभ झाला. हजारो नागरिकांनी 'जय गुरुदेव'च्या घोषात त्यांचे स्वागत केले. श्री श्री रविशंकर यांनी मंचावरुन हात वर करत उपस्थितांना अभिवादन करताच एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष मार्गदर्शनास सुरुवात झाली. प्रारंभीच 'कसे आहात?' असे मराठीतून विचारत त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला प्रारंभ केला.
शारीरिक सुदृढतेबरोबर मनाची सुदृढताही गरजेची :जीवन गतिशील झाले आहे. आतापर्यंत आपण काय जगलो, कसे जगलो हे देखील आठवत नाही. समस्या सर्वांनाच येतात. त्या पार करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये असते. ज्या ठिकाणी विश्वास असतो तेथे समस्यांचे निवारण होते, असे त्यांनी सांगितले. शारीरिक सुदृढतेबरोबर मनाची सुदृढताही गरजेची आहे. त्यासाठी ध्यान, ज्ञान व गान या त्रिसूत्रिचा स्वीकार करावा. प्रत्येकासोबत प्रेमाने वागावे, कुणाचाही अनादर करु नये. भारतीय संस्कृतीही महान आहे, ती पुढे नेण्याचे काम आपण सर्वांनी करावे. मागील काळात कोरोनाने संपूर्ण जगाला हैराण केले. याच कोरोनाचा विषाणू शंभर टक्के बरे करणारे औषध आयुर्वेद आणि सिद्धाने निर्माण केले, असे त्यांनी सांगितले.
राजकारणात वैचारिक मतभेद गरजेचे :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गुरुद्वाराचे पंचप्यारे, माता साहिब गुरुद्वारा आणि नांदेड आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने श्री श्री रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले. या संपूर्ण मराठवाड्यातून नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असतात, परंतू अलिकडच्या काळात व्यक्तिगत द्वेष वाढत आहेत. याविषयी मार्गदर्शन करावे, अशी विनंती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली. त्यावर श्री श्री रविशंकर म्हणाले, राजकारणात वैचारिक मतभेद गरजेचे आहेत. या समस्येवर विविध दृष्टीने प्रकाश टाकला जातो. राजकारणातील वैचारिक मतभेद हे त्या काळापुरते असावेत. ते व्यक्तिगत पातळीवर पोहचू नयेत. व्यक्तगत मतभेद वाढल्यास सन्मान कमी होईल.