महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळमुक्तीसाठी सूर्योदय फाऊंडेशनचा पुढाकार, नांदेडमध्ये गाळ काढण्याची कामे सुरू - अनुराधा पौडवाल

तीर्थक्षेत्र माहूर येथील २० वर्षांपूर्वीच्या मातृतीर्थातील तसेच इतर कुंडामधील गाळ काढण्याचे काम सूर्योदय फाऊंडेशनने हाती घेतले आहे. २० एप्रिलपासून हे काम सुरू झाले असून आतापर्यंत २ लाख क्युबिक मीटर गाळ काढल्याची माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा पौडवाल यांनी दिली.

सूर्योदय फाऊंडेशनतर्फे नांदेडमध्ये नाळ काढण्याचे काम सुरू

By

Published : May 14, 2019, 12:51 PM IST

Updated : May 14, 2019, 1:15 PM IST

नांदेड - मुंबईच्या सूर्योदय फाऊंडेशनने नांदेड जिल्ह्यातील १० गावे दत्तक घेतली आहेत. याठिकाणी लोकसहभागातून नाला खोलीकरण आणि सरळीकरण तसेच बंधाऱ्याची कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सूर्योदय फाऊंडेशनतर्फे नांदेडमध्ये नाळ काढण्याचे काम सुरू

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला श्रीकांत चव्हाण, दीपक मोरताळे, ईश्वर पाटील, विश्वजीत कपिले, संगमेश्वर नळगिरे, अमोल अंबेकर, अच्युत महाजन, विनोद भारती, आदित्य शहाणे, अमोल कदम, उदय संगारेड्डीकर आणि धनंजय नलबलवार यांची उपस्थिती होती.

प्रामुख्याने तीर्थक्षेत्र माहूर येथील २० वर्षांपूर्वीच्या मातृतीर्थातील तसेच इतर कुंडामधील गाळ काढण्याचे काम फाऊंडेशनने हाती घेतले आहे. २० एप्रिलपासून हे काम सुरू झाले असून आतापर्यंत २ लाख क्युबिक मीटर गाळ काढल्याची माहिती पौडवाल यांनी दिली.

साडेतील शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकामातेच्या आणि श्री दत्तप्रभूच्या आशीर्वादामुळे माहूर येथे कुंडातील गाळ काढण्याच्या कामासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली. रेणुकाआईने हे काम आमच्याकडून करवून घेतले. विशेष म्हणजे गाळ काढल्यानंतर यापैकी अनेक कुंडांमध्ये पाण्याचे मोठे झरे खुले झाले. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही येथे पाण्याचा स्त्रोत तयार झाला, असेही त्यांनी सांगितले.

लोहा तालुक्यातील वडे पुरी, कलंबर (बु.), भिलूनाईक तांडा कामजळगेवाडी, पोलीसवाडी, पोखरभोसी येथेही फाऊंडेशनच्यावतीने नाला सरळीकरण आणि खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत. याशिवाय दापशेड, उमला तांडा, रूपसिंग तांडा, विठोबा तांडा, हरिश्चंद्र तांडा, नडू तांडा येथेही तलाव खोलीकरण आणि सीसीटी बंधाऱ्याची कामे करण्यात येत असल्याचे पौडवाल यांनी सांगितले. ५ गावांमध्ये शिवनेरी बंधारेदेखील बांधण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी सुरू केलेल्या या कामांमध्ये स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्यांचेही सहकार्य मिळत आहे. काही ठिकाणी लोकसहभागातून जेसीबीसाठी डिझेलचा खर्च भागवला जात आहे. या कामात आतापर्यंत शासनाची कोणतीही मदत आम्ही घेतली नाही. दरम्यान, या गावांमध्ये लवकरच एक लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प आहे. तसेच नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा प्रयोगदेखील या गावांमध्ये फाऊंडेशन करणार असल्याची माहिती पौडवाल यांनी दिली.

Last Updated : May 14, 2019, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details