प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे नांदेड Supriya Sule On Nanded Patients Death Case :नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्यावाढत्या मृत्यूवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत. कारण सरकारच्या हलगर्जीमुळे नांदेड येथील रुग्णालयात चाळीसहून अधिक मृत्यू झालेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजीनामा घ्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हा विषय लोकसभेत देखील मांडणार : खासदार हेमंत पाटील यांनी डॉक्टरांशी केलेल्या गैरवर्तणुकीवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. अशी नाटकं मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यासमोर करा. सत्तेत असलेल्या खासदारांनी डॉक्टरांचा अपमान करणं चुकीचं आहे. या घटनेचा निषेध करत हा विषय इथेच नाही तर लोकसभेत देखील मांडणार असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या वेदना आहेत, मात्र त्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या पध्दतीने मांडा, असंही त्या म्हणाल्या.
दिल्लीतील अदृश्य हात, महाराष्ट्राचा अपमान करतायत : पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीसंदर्भात विचारलं असता त्या म्हणाल्या की, दिल्लीतील अदृश्य हात हे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करतायत. महाराष्ट्राच्या वाट्याला अपयश कसं येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात जो राहतो तो मराठी, याच महाराष्ट्रातील दोन मराठी पक्ष फोडण्याचं काम दिल्लीतील या अदृश्य हातांनी केलंय. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं त्यापेक्षाही अर्धा वाटा केला, अशाप्रकारे सातत्याने महाराष्ट्राला अपमानित केलं जात आहे.
देशात आणि महाराष्ट्रात जातीय जनगणना झाली पाहिजे : पुढे त्या म्हणाल्या की, देशात आणि महाराष्ट्रात जातीय जनगणना झाली पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायम जातीय जनगणनेच्या समर्थनात आहे. दोन दिवसांपूर्वीच मी याबाबत मागणी केली होती, सोबतच दीड ते दोन वर्षे सातत्याने संसदेमध्ये आम्ही जातीय जनगणनेची मागणी केली आहे, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा -
- Nanded Hospital Death Case : नवजात बाळासह आता आईनंही सोडला श्वास; नातेवाईकांचा आक्रोश
- Nanded Hospital Death : अस्वच्छता पाहून मला लाज वाटते, रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई - मंत्री हसन मुश्रीफ
- Nanded Hospital Death : ५०० खाटांच्या रुग्णालयात १२०० रुग्णांवर उपचार सुरु, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस