नांदेड - विष्णुपूरी येथील कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन महिला सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याची घटना १४ सप्टेंबरला घडली. या दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विष्णुपूरी येथील कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन महिला सुरक्षारक्षक कर्मचारी शनिवारी सकाळी कर्तव्यावर आल्यावर कार्यालयात स्वाक्षरी करण्यासाठी गेले असता, वरिष्ठ अधिकारी प्रदीप उबाळे यांनी वाईट उद्देशाने हात धरून माझे ऐकत नसाल तर तुमची वर्दी उतरवून नोकरीवरुन काढुन टाकील, अशी धमकी दिली. त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळुन महिला सुरक्षा रक्षकाने शनिवारी सकाळी बॅगमधील डास मारण्याचे औषध प्राशन केले, दरम्यान, सोबतच्या महिला रक्षकाने तिच्या हातातील बाटलीला धक्का दिला. यामुळे त्यातील विषारी औषध उडून तिच्याही तोंडात गेले. यानंतर घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी या दोन्ही महिला सुरक्षा रक्षकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.