नांदेड- गेल्या अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासात मराठवाड्यातील अनेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पहिल्यांदाच नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे यापुढे जमिनीतील पाणी पातळीची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारपासून कमी-अधिक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मुखेड, अर्धापूर तालुक्यात अचानक आलेला पाऊस आणि पुरामुळे काही भागात पिकांचेही नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70.00 मि.मी.), उस्मान नगर (80 मि.मी.), फुलवण (80.00 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92.00 मि.मी.) आणि कापशी (79.00 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.