नांदेड- स्ट्रॉबेरीची शेती म्हटले महाबळेश्वर जिल्ह्याची आठवण येते. मात्र नांदेडातील एका तरुणाने चक्क आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. अर्जुन जाधव, असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. लोहा तालुक्यातील डेरला येथे हा यशस्वी प्रयोग केला आहे.
अर्जुन जाधवने विंटर डाऊन जातीच्या स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. ही रोप सातारा येथील रोपवाटिकेतून मागवण्यात आली आहेत. यासाठी जाधव यांना प्रति रोप 12 रुपये खर्च आला आहे. एकूण दहा गुंठे जमिनीवर स्ट्रोबवरीची लागवड करण्यात आली आहे. यासाठी एकूण खर्च 80 हजार रुपये इतका आला आहे. तर अर्जुन जाधव यांना स्ट्रॉबेरीच्या शेतीतून 80 क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा आहे.
अशी केली लागवड
स्ट्रॉबेरी लागवडीपूर्वी शेतीची मशागत करण्यात आली. शेणखत, गांडूळ खत आणि बुरशी नाशकाचा वापर करण्यात आला. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी चार फूट अंतरावर गादी वाफे तयार केली आहेत. त्यावर ठिंबक सिंचन आणि मल्चिंग (पलवार) करण्यात आली आहे. एक फूट अंतरावर एकूण सहा हजार रोपे लावण्यात आली आहेत. अर्जुन जाधवने यासाठी कसलाही रासायनिक औषधांचा वापर केला नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.