नांदेड- हुनर किसी का मोहताज नही होता, याचे उत्तम उदाहरण नांदेडच्या 'वसीमा शेख' हिने दाखवून आहे. वसीमाची आई घरोघरी जाऊन बांगड्या विकते तर भावाचा ऑटो चालविण्याचा व्यवसाय आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून वसीमाने महिलांमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. वसीमाने आपल्या कुटुंबाचे नाव आकाशाच्या उंचशिखरावर नेऊन ठेवले असून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.
वसीमा कुटुंबीयांसह जिल्ह्यातील जोशी सांगवी (ता. कंधार) या गावात राहते. चार बहिणी, दोन भाऊ, आई-वडील असे कुटुंब आहे. वडील मानसिक आजारी असल्याने वसीमाची आई गावात घरोघरी जाऊन महिलांना बांगड्या घालते. तर भाऊ पुण्यात ऑटोरिक्षा चालवतो. तर दुसरा एक भाऊ इम्रानने बी.एस.सी. (विज्ञान पदवी) मिळविली आहे. परंतु घराची स्थिती बिकट असल्याने त्यानेही मेहनत करण्यास सुरुवात केली. वसीमाच्या कुटुंबीयांनी तिच्या अभ्यासासाठी कधीच पैसे कमी पडू दिले नाहीत.
घरोघरी जाऊन बांगड्या विकणारी आई; ऑटो चालवणारा भाऊ अन् 'ती' ची उपजिल्हाधिकारी पदापर्यंतची मजल
नांदेड जिल्ह्यातील वसीमा शेख हीची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. वसीमाची आई घरोघरी बांगड्या विकते, तर तिचा भाऊ रिक्षा चालवतो. अशा परिस्थितीत वसीमाने यश संपादन केले आहे.
वसीमा शेख
घरात अठरा विश्व दारिद्र्य, वडिलांचे आजारपण अशा बिकट परिस्थितीत आई व भावाने वसीमाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. घरच्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून वसीमा उपजिल्हाधिकारी बनली आहे. दिवसेंदिवस शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. या स्पर्धेच्या युगात झोपडपट्टीत राहणाऱ्या वसीमा या मुलीने आपल्या प्रचंड मेहनतीतून अशक्य काहीच नसते हे जगाला दाखवून दिले आहे.
लोहा तालुक्यातील जोशी सांगवी गावातील जिल्हा परिषद शाळेत वसीमाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे बाल ब्रह्मचारी या शाळेत तिने सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. कंधार येथील प्रियदर्शिनी गर्ल्स हायस्कूलमध्ये अकरावी-बारावीमध्ये शिक्षण घेतले. वसीमाने पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतले. वर्तमानपत्रांमधील लोकांची यशोगाथा वाचल्यानंतर वसीमा यांनी ठरवले की, तीही एमपीएससीसाठी तयारी करेल. यासाठी ती पुण्याला गेली होती. वसीमा यांनी २०१८ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली आणि तिची विक्रीकर निरीक्षक पदासाठी निवड झाली. नागपूर विभागात ती काम करत होती. पण वसीमाचे ध्येय मात्र मोठे होते. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. यावेळच्या २०१९ निकालात मात्र तीने मोठे यश मिळवले आहे. नुकतेच ८ जून रोजी वसीमाचे लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील हैदर शेख यांच्याशी लग्न झाले आहे.
'माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबाला'
वसीमा सांगते, 'माझ्यातील दगडाला जोशी सांगवीच्या शाळेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी शिल्पकारासारखे कोरून कोरून शिल्प तयार केले. त्याचीच परिणीती म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर गट – १ अधिकारी म्हणून उभी आहे. माझे वडील मानसिक आजारी आहेत. आईने मोल-मजुरी करून आणि बांगड्या विक्रीचा व्यवसाय करीत मला शिक्षण दिले. माझा भाऊ ऑटो रिक्षा चालवून माझ्या शिक्षणसासाठी मदत करीत होता. माझ्या या सर्व यशाचे श्रेय आई आणि भावाला आहे'.
Last Updated : Jun 27, 2020, 7:47 PM IST