नांदेड - स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षाने सहकाऱ्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. हा प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पीडितेच्या पतीने पत्रकार परिषद घेऊन समोर आणला. हा प्रकार माध्यमांसमोर आल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात माधव देवसरकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती देताना पीडित महिला - माधव देवसरकर यांच्यावर महिलेला अश्लील इशारा केल्याचा आरोप -
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माधव देवसरकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. देवसरकर यांनी आपल्याच संघटनेत सहकारी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पत्नीला रात्री उशिरा व्हॉट्सअॅप चॅटिंग केल्याचा आणि भेटीचे निमित्त करून घरी येऊन डोळ्याने इशारा केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
- देवसरकर यांना समज देऊनही गैरवर्तन करणे थांबले नाही-
काही दिवसांपूर्वी देवसरकर यांनी आपल्या सहकऱ्याच्या पत्नीला रात्री उशिरा मेसेज करून फेसबुक रिक्वेस्ट पाठवली होती. ती स्वीकारण्याच्या मागणीचा मेसेज देखील पाठवला होता. हा सर्व प्रकार त्या महिलेने तिच्या पतीला सांगितला होता. त्यावेळी देवसरकर यांना समज देण्यात आला होता, मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्याच महिलेला अश्लील इशारा केल्याचा धक्कादायक प्रकार देवसरकर यांनी केला असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. पतीच्या माध्यमातून देवसरकर यांना सांगूनही गैरवर्तन थांबले नसल्यामुळे ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे, असे त्या महिलेने सांगितले आहे.
हेही वाचा -अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर घेणार मोकळा श्वास
- तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ-
देवसरकर हे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा आरक्षण मुद्द्यावरून त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. त्यामुळे त्यांची जिल्हा पातळीवर चांगली ओळख आहे. देवसरकर यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मूक आंदोलन केलं होतं. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती देखील होती. महिलेने पोलिसांना तक्रार घेण्यासाठी विनंती केली होती, मात्र पोलिसांनी ही तक्रार संशयास्पद असल्याचं सांगत टाळाटाळ केली. हा प्रकार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उघड झाल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला गालबोट-
मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील वीस वर्षांपासून रेटला जात आहे. मोठ्या कालावधीनंतर मराठा समाजाने एकत्र येत सरकारला हादरवून टाकणारे मोर्चे शांततेत काढली, या मोर्चात महिलांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मात्र नांदेडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धक्का बसला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षानेच आपल्या संघटनेतील सहकाऱ्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे मैत्रीच्या नात्याला काळिमा फासल्याची खंत मराठा संघटनांमधून व्यक्त केली जात आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना रोखल्या जाव्यात अशी मागणी करत भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरात ही आंदोलने सुरू असताना, नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. वाईट हेतूने पाहत अश्लील इशारे केल्याचं पीडितेच्या पतीने सांगितलं आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा -बाप्पाला निरोप दिल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर शाहरुख खान