महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूकडे लक्ष द्यावे, नागरिकांची मागणी - दारू

नववर्षाच्या स्वागतावेळी तरुण पिढी आनंद व जल्लोष करते. काहीवेळा मद्य प्राशन करण्यात येते त्यावेळी काही ठिकाणी बनावट दारू विक्री करून बार व वाईन शॉपचे मालक, चालक तरुणांची फसवणूक करतात. त्यामुळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील जनतेकडून होत आहे.

अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड
अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड

By

Published : Dec 31, 2019, 7:50 AM IST

नांदेड- सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण पिढी आनंद, जल्लोष करते. यामुळे जिल्ह्यातील बार व धाब्यावर बनावट दारू मोठ्या प्रमाणात आली आहे. युवकांच्या आरोग्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान, नायगाव तालुक्यासह मुखेड, बिलोली, देगलूर या चारही तालुक्यात वाईन शॉप नसल्यामुळे नरसी-नायगाव परिसरातील बार चालकांनी धाब्यावर बनावट दारू मोठ्या प्रमाणात जमा केली आहे. कुठलीही परवानगी नसतानाही बार, धाब्यावर बिनदिक्कतपणे बनावट दारूची विक्री होत आहे. बारमध्ये आणि बाहेर पार्सल घेऊन जाणाऱ्या 90 टक्के युवकांकडे दारूचा परवाना नाही. बारमध्ये बसून दारू पिण्याऱ्याकडे देखील परवाना नाही. मात्र, बार चालक दारूप्रमाणे बनावट रजिस्टर तयार करून ठेवतात.

या सर्व बाबींची उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना कल्पना असूनही मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका बजावत असल्याचा आरोप काहीजण करत आहेत. तर पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी पालकांतून केल्या जात आहेत. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत नांदेड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापा टाकून कारवाई करत लाखो रुपयांहून अधिक बनावट मद्य जप्त केले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रँडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचे प्रशासनाच्या नजरेस आले आहे.

नरसी, नायगाव, बिलोली, मुखेड, देगलूर, धर्माबाद परिसरात ब्रँडेड बनावट दारू ठिकठिकाणी विक्री होत असल्याची माहिती असतानाही व एमआरपीपेक्षा अधिक दराने दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून उत्पादन शुल्कच्या बिलोली उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. राज्यात नव वर्षाच्या स्वागतानिमित्ताने रात्रभर बार व हॉटेल चालूच राहणार असल्याने पोलीस प्रशासन अवैध दारूला आळा घालण्यासाठी काही प्रयत्न करेल का, असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

हेही वाचा - दैव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!

ABOUT THE AUTHOR

...view details