नांदेड- कोरोना उपाययोजनेसाठी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी विविध ठिकाणी छापे मारून गावठी दारू प्रकरणी 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सात आरोपींना अटक केली असून उर्वरित 10 गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. पथकाने गावठी दारू व साहित्यासह 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी अत्यावश्यक वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने मद्य शौकिनांची चांगलीच गोची झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री होत असल्याने काळा बाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. नेहमीची सवय असलेल्या अनेकांना हे चढे दर परवडत नसल्याने सहज उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीच्या अवैध दारुकडे ते वळले आहेत.