नांदेड- देशासाठी हुतात्मा झालेल्या जवान संभाजी कदम यांच्या 6 वर्षीय मुलीला शाळेत प्रवेश देण्यासंबंधीचे आदेश शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. 'वीरमरण पत्करलेल्या जवानाच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारणे अतिशय निंदनीय आहे. या मुलीला लवकरात लवकर शाळेत प्रवेश मिळावा यासंबंधीचे आदेश दिले आहेत. तसेच, प्रवेश नाकारणाऱ्या ज्ञानमाता शाळेवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत,' अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील वीर जवान संभाजी कदम यांची मुलगी तेजस्विनी हिला ज्ञानमाता या इंग्रजी शाळेने प्रवेश नाकारला होता. मुलीची आई वीरपत्नी शीतल कदम यांनाही अपमानास्पद वागणूक दिली होती. माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर राज्य सरकारने संबंधित प्रकरणावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या मुलीला लवकरच चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. संभाजी कदम नांदेड जिल्ह्यातील जानापूरी गावचे वीर जवान आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांना वीरमरण आले होते. संभाजी कदम यांच्या अंत्यविधीवेळी याच जिल्ह्यातील नव्हे तर, आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारो लोक दर्शनासाठी आले होते.