नांदेड - श्री रामनवमीनिमित्त रामजन्मोत्सव समितीच्यावतीने शनिवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावर्षीची रामनवमीची मिरवणूक सैनिकांना समर्पित करण्यात आल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले. शनिवारी दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करून आरती केली जाणार आहे. त्यानंतर गाडीपुरा येथील रेणुकामाता मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल.
श्री रामनवमीनिमित्त आज नांदेड शहरात भव्य मिरवणूक - Sri Ram Navami
शनिवारी दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करून आरती केली जाणार आहे. त्यानंतर गाडीपुरा येथील रेणुकामाता मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल.
या शोभायात्रेत १२ प्रकारचे गट तयार करण्यात आले आहेत. ढोल पथक, रामाची पालखी, महापुरुषांची झांकी, महिलांचे ढोलपथक, राम दरबार, भजनी मंडळ, त्यानंतर बाराफूट उंच श्रीरामाची मूर्ती असेल. त्यानंतर सुरक्षारक्षक व स्वच्छतेसाठी स्वयंसेवक असतील. जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक स्वच्छता करतील.
यावर्षी रामनवमीची मिरवणूक सैनिकांना समर्पित असून २०० युवक सैनिकांच्या वेशात सहभागी होणार आहेत. मिरवणुकीमध्ये एका ट्रकवर मिसाईल ठेवण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जवळपास तीन लाख रामभक्त सहभागी होतील, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली आहे. श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रा निघणार असल्याने पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व संयोजन समितीचे सदस्य यांची बैठक नुकतीच पार पडली.