नांदेड- जसजसा उन्हाचा पारा वाढत आहे, तशी पाण्याची समस्या वाढताना दिसत आहे. लोहा तालुक्यातील सोनमांजरी गावात पाणीटंचाईमुळे गावकरी अडचणीत आले आहेत. हंडाभर पाण्यासाठी वृद्ध आणि मुलांना भटकंती करावी लागत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर चढल्याने आत्ताच नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या पावसामुळे शहरी भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र अनेक वाडी तांड्यावर पाण्याचा तुटवडा भासू लागला. सोनमांजरी गावात हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. मागीलवर्षी झालेल्या पर्जन्यमानाच्या सरासरी १०६ टक्के पावसाने नांदेड जिल्हा सुखावला होता. या पावसानं आजही जलस्रोत वाहत आहेत. असं असले, तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र अनेक वाडी तांड्यावर पाणी टंचाई भासत आहे.
गावातील लहान मुलं वृद्ध महिला आणि पुरुष हंडाभर पाण्यासाठी भटकंती करतात. अनेकवेळा पाण्याविना लोक हाकलून देतात. अशा परिस्थितीत जनावरांना देखील पिण्यायोग्य नाही असं पाणी त्यांना वापरावं लागत आहे. सोनमांजरी गावात पाणी टंचाईची समस्या दरवर्षीचीच आहे. साडे पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात पाणी पुरवठ्याच्या योजना राबवल्या गेल्या. मात्र त्या कागदावरच राहिल्या अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. जवळच असलेल्या सुनेगाव तलावातून गावाला पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गावकऱ्यांच्या मागणीला प्रशासन गांभीर्यानं घेईल, का हे पाहणं औत्सुक्याच ठरेल.