नांदेड - घरगुती कारणावरून पोटच्या मुलानेच तीक्ष्ण हत्याराने वार करुन पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हदगाव तालुक्यातील माटाळा येथे घडली. हरिभाऊ नामदेव दामोदर (वय - ५५) असे मृताचे नाव आहे.
माटाळा येथील गावातील हरिभाऊ दामोदर यांचा मुलगा बालाजी हरिभाऊ दामोदर याच्याशी घरगुती कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की बालाजी याने पिता हरिभाऊ दामोदर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने छातीत चार वार केले. या हल्ल्यात हरिभाऊ गंभीर जखमी झाल्याने त्यांना शिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.