नांदेड - सतत दारू पिऊन येऊन घरातील सदस्यांना नेहमी मारहाण व मानसिक त्रास देणाऱ्या बापाचा पोटच्या मुलानेच गळा चिरून हत्या केल्याची घटना बिलोली तालुक्यातील अटकळी येथे उघडकीस आली आहे. मारोती रघुपती असे मृत व्यक्तीचे नाव असून भुजाजी असे आरोपी मुलाचे नाव आहे.
नांदेड : रोजच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलाने केला दारूड्या बापाचा खून - नांदेड गुन्हेवार्ता
दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत नेहमी घरातल्या सदस्यांचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या दारुड्या बापाची पोटच्या मुलाने गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी मृताची पत्नी पारूबाई मारोती रघुपतीने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा भुजाजी मारोती रघुपती याच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली तालुक्यातील आटकळी गावातील मारोती रघुपती याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत तो नेहमी घरातल्या सदस्यांचा मानसिक व शारीरिक छळ करत असे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मारोती हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. दारुच्या नशेत तो पत्नी व मुलासोबत वाद घालत होता. त्यावेळी मारोती याची बहीणदेखील होती. आत्याच्या देखतच आपला बाप शिवीगाळ करत असल्याने भुजाजी याने रागाच्या भरात धारधार चाकूने मारोतीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मारोती याचा काही क्षणातच मृत्यू झाला.
माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी अटकळी येथील घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी मृताची पत्नी पारूबाई मारोती रघुपती हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा भुजाजी याच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.