नांदेड -सामाजिक कार्यकर्त्याने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडात घडली आहे. लोहा तालुक्यातील चोंडी येथे शिवदास ढवळे यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
दहा वर्षांपूर्वी केलेल्या बांधकामाच्या चौकशीची केली होती मागणी
जिल्ह्यातील लोहा तालुक्यात चोंडी येथे वनविभाग नांदेड परिक्षेत्रातंर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नाल्याचे बांधकाम करण्यात आले होते. या दहा वर्षांपूर्वी झालेल्या बंधाऱ्याची चौकशी करण्याची मागणी शिवदास ढवळे यांनी केली होती. बंधाऱ्याचे बांधकाम करताना चार हरीण, दहा मोरांची हत्या झाली होती असा आरोप शिवदास ढवळे यांनी केला होता. या प्रकरणात आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी ढवळे यांनी वन विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता.
चोंडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची आत्महत्या बंधाऱ्याच्या बांधकामावेळी झाली होती पार्टी.?
२००९-२०१० मध्ये चौंडी येथे मनरेगा योजनेतून बंधाऱ्याचे बंधकाम झाले होते. यावेळी संबंधित गुत्तेदार आणि काही राजकीय पुढाऱ्यांमध्ये पार्टी झाल्याचा संशय शिवदास ढवळे यांचा होता. पार्टीनंतर उरलेली हाडे बंधाऱ्याच्या बांधकामात टाकण्यात आल्याचा आरोप ढवळे यांनी केला होता. यामुळेच त्यांनी या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र ढवळे यांच्याकडे या संबंधी कसलाही पुरावा नसल्याने चौकशी करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले.
गृहमंत्र्यांना दिले होते निवेदन
बंधाऱ्यात मोर आणि हरणाचे अवशेष असल्याचा आरोप ढवळे यांनी केला होता. या प्रकरणात चौकशी होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ता शिवदास ढवळे यांनी राज्याचे गृहमंत्री, नांदेड जिल्हाधिकारी, नांदेड वन विभाग, जिल्हा पोलिस प्रशासन यांना १६ मार्च २०२१ रोजी निवेदन देऊन, या प्रकरणात चौकशी करावी अन्यथा २८ एप्रिल २०२१ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, मात्र वन विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे आज चौंडी बंधाऱ्यावर जाऊन शिवदास ढवळे यांनी आत्मदहन केले. आत्मदहनापूर्वी त्यांनी लिहिलेल्या नोट मध्ये काही लोकांची नावं लिहिली आहेत. याप्रकरणी सुदमताबाई देविदास गीते, देविदास जळबा गीते, सदाशिव देविदास गीते, ज्ञानेश्वर देविदास गीते, गोविंद हरिश्चंद्र केंद्रे, सटवा सांगळे (सर्व राहणार चोंडी) यांच्या विरोधात माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत. दरम्यान आरोपींना ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी नातेवकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
हेही वाचा -ठरलं..! राजू शेट्टींचा महाडिक गटाला पाठिंबा; गोकुळ 'मल्टिस्टेट' होणार नसल्याचे आश्वासन