नांदेड - मुदखेड शहरातील अनधिकृत कत्तलखाना बंद करण्यासाठी आज मुदखेडकरांनी बंद पुकारला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत मुदखेड पालिकेविरोधात मोर्चा काढला.
शहरातील कत्तलखाना बंद करण्यासाठी मुदखेडकरांचा बंद - कत्तलखाना
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील अनधिकृत कत्तलखाना बंद करण्यासाठी आज मुदखेडकरांनी बंद पुकारला. तसेच पालिकाविरोधात मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी हा कत्तलखाना बंद करण्याची मागणी केली.
मोर्चावेळी शहरातील अनधिकृत कत्तलखाना बंद झालाच पाहिजे, उघड्यावर मास विक्री बंद करा, या घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पालिकेवर धडकला. यावेळी मोर्चेकरांनी पालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. बंदला शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पालिका प्रशासनाचा विरोध करत मोर्चात सहभाग नोंदवला.
शहरात मागील कित्येक वर्षापासून अनधिकृतपणे मुक्या जनावरांचा कत्तलखाना पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राजरोस पणे चालू आहे, असा आरोप काही नागरिकांनी केला. हा कत्तलखाना मुदखेड शहराच्या मध्यभागी असल्यामुळे कत्तलखान्यात दररोज शेकडो जनावरे अनधिकृतरीत्या कत्तल केली जातात. या कत्तलीमुळे रक्ताचे पाट नाल्यात वाहून शहरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे दुर्गंधीमुळे शहरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, यामुळेच आम्ही आंदोलन करत आहोत, अशी माहिती शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिली.