नांदेड :श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना समजला जातो. या महिन्यात उपवास, व्रत वैकल्य केले जातात. या महिन्यात शंकराची पूजा केल्याने चांगले फळ मिळते, असे मानले जाते. दर सोमवारी शंकराची विशेष पूजा केली जाते. आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. नांदेडच्या हिमायतनगर येथे श्रावण महिन्याचे स्वागत करत शहरातून भव्य मंगल कलश शोभा यात्रा काढण्यात आली. श्री परमेश्वर मंदिरापासून ही शोभा यात्रा काढण्यात आली. यात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हिमायत नगरमधील महिलांनी पारपरिक पद्धतीने मंगल कलशची पूजा केली. राहेर ते नरसी येथील प्राचीन महादेव मंदिरा दरम्यान कावड यात्रा काढण्यात आली होती.
Shravan 2023: 'कलश शोभा यात्रा' काढून उत्साहात श्रावण महिन्याचे स्वागत, महादेवाला रुद्र अभिषेक - Mangal Kalash Shobha Yatra
श्रावण महिना म्हटले की सण-उत्सव, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रम असे आनंददायी, उत्साही वातावरण डोळ्यासमोर येते. बुधवारी दुपारी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. नांदेडमध्ये श्रावण महिन्याचे स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आले आहे.
कावड तसेच टाळमृदुंगासह सहभाग :अधिक मासाच्या समाप्तीच्या निमित्ताने काढलेल्या कावडयात्रेत हजारो स्त्री पुरुषांनी कावड तसेच टाळमृदुंगासह सहभाग नोंदवला. पवित्र श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला महादेवाला रुद्राभिषेक करत सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली होती. या सोहळ्याला नायगाव तालुक्यातील शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राहेर येथील प्राचीन शिव मंदिर पंचकृषीत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महादेवाची मोठी पिंड आहे. त्यामुळे या परिसरात भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने पाहायला मिळते. पवित्र श्रावण मासास सुरुवात झाल्यामुळे भाविकांनी भक्तीभावाने कावड यात्रा काढली. यावेळी महादेवाला रुद्र अभिषेक करण्यात आला.
भाविक मोठ्या संख्येने उपस्थित : अधिक श्रावण मासानिमित्त 'अखंड हरिनाम सप्ताह श्री रामलिंग देवस्थान रामपूर ता. देगलूर' येथे सप्ताह समाप्ती (काला) निमित्ताने माजी आमदार सुभाष साबणे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे प्रतिनिधी म्हणून अवधूत मामा भारती उपस्थित होते. त्यांचा रामलिंग देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड शहरातील चैतन्य नगर येथील शिव मंदिरात देखील पवित्र श्रावण मास समारंभानिमित्त आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केला होती. भाविकांनी महाआरतीत आपला सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा :