महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेरणीअगोदर थकित एफआरपी द्या; अन्यथा आंदोलन, शिवसेनेच्या प्रल्हाद इंगलेंंचा इशारा - Shivsena leader Pralhad Ingole

ऊस गाळपाला गेल्यानंतर पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, भाऊराव चव्हाण, पूर्णा, टोकाई सह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम थकवली आहे.

Pralhad Ingole
प्रल्हाद इंगोले

By

Published : Jun 4, 2020, 8:40 PM IST

नांदेड - विभागातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षीची थकीत एफआरपी रक्कम अद्याप प्रलंबित आहे. पेरणीअगोदर साखर कारखान्याकडील थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्यास प्रशासनाने भाग पाडावे. अन्यथा, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगाेले यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

ऊस गाळपाला गेल्यानंतर पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असताना, भाऊराव चव्हाण, पूर्णा, टोकाई सह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम थकवली आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

कोरोना संकटाच्या काळातही कवडीमोल दराने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाने सर्व कारखान्यांना सक्त ताकीद देऊन या आठवड्यात 10 जूनपर्यंत थकीत एफआरपी शेतकर्यांना तत्काळ द्यावी. अन्यथा, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

पालकमंत्र्यांनी आपल्या कारखान्यापासून सुरुवात करावी -

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना आजार झाल्याने ते लवकर बरे व्हावेत. यासाठी शेतकर्यांसह सर्व नागरिकांनी प्रार्थना केली. ते आता पूर्ण बरे झाल्याचे वृत्त आहे. दवाखान्यात उपचार घेत असतानाही त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आदेशावरुन ‘स्पीकअप इंडिया’ या अभियानात भाग घेतला होता. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या विनंतीवरून त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे असलेली थकीत एफआरपी देण्याची सुरुवात करुन पेरणी अगोदर शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details