महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यराणी एक्सप्रेसच्या उद्घाटनाला शिवसेना-काँग्रेस नेत्यांना डावलले, सेनेने केला निषेध - नांदेड ते मुबंई

नांदेड ते मुबंई राज्यराणी एक्सप्रेसच्या उद्घाटनाला काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांना डावलल्याने शिवसेनेने नांदेड येथे काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

आंदोलन करताना शिवसैनिक
आंदोलन करताना शिवसैनिक

By

Published : Jan 11, 2020, 12:30 PM IST

नांदेड- राज्यराणी एक्सप्रेस रेल्वे नव्याने धावणाऱ्या नांदेड ते मुबंई या रेल्वेला खासदार चिखलीकर यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. उद्घाटन कार्यकर्माच्या निमंत्रण पत्रिकेत सेनेचे हिंगोली खासदार हेमंत पाटील यांचे नाव नसल्याने सेना पदाधिकाऱ्यांनी डी. आर.एम. कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलन करताना शिवसैनिक

नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचे आज (दि. 11 जाने.) नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. परंतु, या कार्यक्रमाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना डावलून कार्यक्रमाला राजकीय झाल चढली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी रेल्वेच्या डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करीत निषेध नोंदविला. नांदेड येथून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील खासदार आणि रेल्वे प्रवाशी संघटनांकडून रेल्वे प्रशासनावर दबाव येत असल्याने रेल्वे बोर्डाने राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. ही रेल्वे नांदेडला नेण्याच्या निर्णयावर मनमाड, नाशिक येथील खासदारांसह रेल्वे प्रवाशांनी विरोध दर्शविला आहे. परंतु, त्यात रेल्वे बोर्डाने मनमाडसाठी स्वतंत्र डबे देत नाशिक, मनमाडकरांचा विरोध थंड केला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील खासदारांशी यासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही चर्चा केली होती. दरम्यान, राज्यराणी एक्स्प्रेसचे शुक्रवारी (दि. 10 जाने.) खासदार प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्यासह महापौर आणि इतर लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. परंतु, नांदेडच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या आणि जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना या कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांना निमंत्रित केले असते तर राजकीय शिष्टाचारानुसार पालकमंत्री म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे लागले असते. त्यामुळे निमंत्रणच न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन

खासदार हेमंत पाटील यांना जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करत आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. यावेळी महानगरप्रमुख अशोक उमरेकर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, निकिता शहापूरकर, तुलजेश यादव आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रण आहे. परंतु, आमचे नेते तथा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना डावलल्याने आपण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

हेही वाचा - आता मुंबई ते नांदेड प्रवास सुकर, खासदार चिखलीकरांच्या राज्यराणी एक्सप्रेसचा हस्ते शुभारंभ

ABOUT THE AUTHOR

...view details