नांदेड- संपूर्ण राज्यात पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थिती असली तरी अर्धापूर तालुक्यात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे येथील हिरवळ आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन परप्रांतीय मेंढपाळ आपल्या हजारो मेंढ्याच्या कळपासह उदरनिर्वाहासाठी अर्धापूर तालुक्यात दाखल झाले आहेत.
परप्रांतीय मेंढपाळ उदरनिर्वाहासाठी नांदेडमध्ये दाखल - खरीप
हिरवळ आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन परप्रांतीय मेंढपाळ आपल्या हजारो मेंढ्याच्या कळपासह उदरनिर्वाहासाठी अर्धापूर तालुक्यात दाखल झाले आहेत.
अर्धापूर तालुक्यात गत वर्षी अंत्यत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्य झाले असले तरी इसापूर धरणातील पाण्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके समाधानकारक आली आहेत. त्याबरोबरच या पाण्यामुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली. त्यामुळे पाण्याच्या शोधात शेकडो परप्रांतीय मेंढपाळ अर्धापूर परिसरात दाखल झाले आहेत.
परप्रांतीय मेंढपाळ जिल्ह्यातील चारा आणि पाण्याच्या शोधात अर्धापूर परिसरातील लहान, लोणी, चेनापूर, पार्डी, पाटणूर, मालेगाव, कामठा, येळेगाव आदी ग्रामीण भागातील परिसरात भटकंती करत आहेत. सोबतच त्यांचे कुटुंबीय आपल्या संसाराचे गाठोडे उंटाच्या पाठीवर टाकून रानावनात फिरतात. सध्या शेतातील पिके काढल्यामुळे पडीक जमीनित मेंढ्याना चारा उपलब्ध होत आहे. त्याबरोबरच शेतीतील पिकांना पाणी देणे बंद असल्याने मेंढ्याना पिण्यासाठी पाणी मिळत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळासह मेंढ्याचे कळप दिसत आहेत.