नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे बोट धरून राजकारणात आले, असे म्हणतात. तसेच, मला राजकारणाची हवा कळते असे ते म्हणाले होते. म्हणूनच सांगतोय हवा बदलत आहे. लोकांच्या भावना बदलत आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश हे बदलत्या हवेचे द्योतक आहे, अशी मिश्किल टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. बुधवारी नांदेडमधील एका कार्यक्रमात पवार यांनी सत्ताधाऱयांवर टिप्पणी केली.
नांदेड येथे पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नांदेड येथे पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय दिग्गज एका मंचावर आल्याने चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. पुतळा समितीचे अध्यक्ष शिवसेना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची सुरुवात करून वाट मोकळी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत कुणी गुरू... कुणी चेला नाही. इथे सगळेच एकाच वर्गातले विद्यार्थी आहेत, असे ते म्हणाले. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरात श्यामराव कदम यांचा पुतळा व्हावा, अशी भावनाही अशोक चव्हाणांकडे बोट करत व्यक्त केली.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी शरद पवार यांच्याभोवतीच भाषण फिरवले. पवार यांचा 'जाणता राजा' असा उल्लेख करत मोदींनी केलेल्या स्तुतीची आठवण करून दिली. मला पवार यांनीच मंत्रिमंडळात घेतले. तर काहींनी पदावरून काढले, अशी चव्हाणांवर अप्रत्यक्षपणे टीका करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
अशोक चव्हाण यांनीही त्यांच्यावरील टीकेचा मिश्किलपणे समाचार घेतला. अशोक चव्हाण बोलताना म्हणाले, की शंकरराव चव्हाण यांना श्यामराव कदम यांनी इमानदारीने साथ दिली. सख्ख्या भावाप्रमाणे साथ दिली. शंकरराव चव्हाण यांनी राज्य सांभाळत नांदेड सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शेवटी कोण कुठे राहायचे, हे जनता ठरवते. जनताच खरी मालक आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
भास्करराव शरद पवार यांच्यामुळे मंत्रीमंडळात आलो असे म्हणतात तर मोदीही पवार साहेबांची स्तुती करतात. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला यश मिळणार यात शंकाच नाही. अतीत के उपर भविष्य का निर्माण होता है.. असे म्हणत विकासात जिल्हा मागे पडता कामा नये, असेही ते म्हणाले.