नांदेड- ज्या गड-किल्ल्यांच्या दर्शनामधून तरुणांना शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास माहिती करुन देवून त्यांना प्रेरणा मिळेल असे काही करण्याऐवजी सध्याचे सरकार या गड-किल्ल्यांवर छमछमची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. आमच्या पुणे जिल्ह्यातील चौफुला येथे असेच छमछमचे आवाज येतात. नांदेड जिल्ह्यातील भोकर फाट्यावरही छमछम छमछमचा आवाज येतो आहे, या शरद पवारांच्या वाक्यावर सभागृहात हशा पिकला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळ्यावात ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले, सध्या राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. शेतकऱ्यांपुढे कोरड्या आणि ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहत आहे. एकीकडे हातचे पीक गेले आणि दुसरीकडे कर्ज वाढत गेले, अशी स्थिती झाल्याने शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. गेल्या वर्षभरात बारा हजार शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. याकडे सध्याच्या सरकारचे लक्ष नाही, शेतकऱ्यांशी त्यांना काहीही घेणे देणे नाही, अशी टीका पवार यांनी केली.